दोन शिक्षकांचे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्याची नामुष्की
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2018 10:44 AM (IST)
राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
संग्रहित फोटो
मुंबई: राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आज शिक्षक दिनी या पुरस्कारांचे साताऱ्यात शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे. मात्र वितरणापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलेले दोन पुरस्कार वादग्रस्त ठरले आहेत. या दोन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार रद्द, तर एक पुरस्कार स्थगित ठेवण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे. प्रक्रिया ऑनलाइन राबवूनही ही निवड वादग्रस्त ठरली. जालना जिल्ह्यातील रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना जाहीर झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द, तर कोपर येथील च. बा. म्हात्रे विद्या मंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांच्या पुरस्काराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक दिनी देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमावरच आता अनिश्चततेचं सावट आहे.