कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा वेतन आदेश काढावा, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णयही यावेळी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अतिरिक्त शिक्षकांनी 'भजन आंदोलन' केलं.


डोक्यावर गांधी टोपी, हातात टाळ आणि मृदुंगाच्या तालात भजन म्हणत कोल्हापुरातील अतिरिक्त शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा वेतन आदेश काढावा, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भजन आंदोलन सुरु केलं.

गतवर्षी झालेल्या संचमान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवली. तरीही 119 अतिरिक्त शिक्षकांना संस्थांनी हजर करून घेतलेले नाही.

शिक्षण संस्थांनी प्रतिसाद न दिल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे डिसेंबर 2016 चे वेतन थांबवण्यात आले आहे. लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णयही यावेळी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी घेतला. मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी सामुदायिक आत्मदहन करण्यात येणार असल्याच शिक्षकांनी सांगितलं.

अतिरिक्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. शासनाने या मागणीची दाखल घ्यावी म्हणून विविध प्रकारची आंदोलनं छेडण्यात येणार आहेत.