लातूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढालेगाव येथील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम शिक्षकास अटक केली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर अहमदपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ढालेगाव येथील एका आश्रम शाळेतील नराधम शिक्षक गणेश बोबडे याने याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा नराधम शिक्षक या मुलीवर अत्याचार करत होता.

शिक्षक सतत अत्याचार करु लागल्यानंतर पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ही गोष्ट जेव्हा गावात सर्वांना समजली तेव्हा लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी किनगाव पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी ताबडतोब त्या नराधम शिक्षकास अटक केली आहे. पीडित मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.