अहमदनगर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी संपली. यामध्ये भारतीय जनता पक्षाने 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 8 जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत.


मोठ्या अटीतटीच्या प्रचारानंतर काल (27 जानेवारी) श्रीगोंदा येथे नगरपरिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी झाली. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. 19 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत 71 उमेदवार रिंगणात उतरले होते. 19 नगरसेवकांपैकी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत पहायला मिळाली. त्यामध्ये भाजपकडून सुनीता शिंदे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून शुभांगी पोटे आणि संभाजी ब्रिगेडकडून सिराबजी कुरेशी या मैदानात उतरल्या होत्या. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे यांनी विजय मिळवला.

श्रीगोंदा नगर परिषद : एकूण जागा 19
भाजप : 11
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8
काँगेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे नगराध्यपदाच्या निवडणुकीत विजयी