पालघर : तौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्‍यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतरही याच ठिकाणी आहे.  मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे. 


समुद्रात या जहाजातून मोठ्या प्रमाणावर ऑइल आणि डिझेलची गळती सुरू असून समुद्रकिनाऱ्यालगत जाळ्याच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या मासेमारी वर याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.  या महाकाय जहाजात 80 हजार  लिटर पेक्षाही अधिक डिझेल असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून देण्यात आली आहे.  या जहाजाचे अनेक भाग हे निकामी झाले असून या होणाऱ्या गळतीमुळे परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर तेलाचे तवंग निर्माण होऊ लागले आहेत .
      
 31 मे पासून दोन महिने शासनाने मासेमारीवर बंदी घातली असून या काळात पश्चिम किनारपट्टीवरील मच्छिमार हे समुद्रकिनाऱ्यालगत जाळ्यामधून मासेमारी करतात. मात्र हे जहाज याच ठिकाणी असल्यास याचा आणखी विपरीत परिणाम येथील मासेमारीवर होणार आहे.  त्यामुळे येथील मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागणार असून येथील स्थानिक मच्छीमारांवर  उपासमारीची वेळ येईल. सरकार आणि शासनाने याची तातडीने दखल घेऊन हे जहाज या  ठिकाणावरून स्थलांतरित करावे अथवा ऑइल आणि डिझेलची गळती थांबवावी. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक मच्छीमारांकडून देण्यात आला आहे.