नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.


रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता. 


यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 


रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात. याचं कारण अनेक क्षेत्रासाठी लाखो-कोटी रुपये दान करत असतात. याचा प्रत्यय कोरोना महामारीतही दिसून आला आहे. कोराना महामारीच्या काळात देश संकटात असताना त्यांनी भारत सरकारला तब्बल 1500 कोटी रुपये दान स्वरुपात दिले होते. टाटा ग्रुपकडून त्यांच्या उत्पन्नातील बुहतांश वाटा चांगल्या कार्यासाठी दान केला जात असतो. 


रतन टाटांच्या आयुष्यावर चित्रपट येणार


देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचे (Ratan Tata biopic) दिग्दर्शन करणार आहेत.  या चित्रपटासाठी संपूर्ण रिसर्च करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शिका सुधा या उत्सुक आहेत. 


ही बातमी वाचा: