मुंबई : डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना 'देशद्रोही' ठरवून कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबईतील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. मालेगावमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.


मालेगावमध्ये डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन करायला हवे. याप्रकरणी संबधित आमदार दोषी असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई करायला हवी, असं राहुल शेवाळे म्हणाले.


हल्लेखोरांना देशद्रोही ठरवा
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांबाबत राहुल शेवाळे म्हणाले की, "संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या सावटाखाली असताना, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणारे 'देवदूत' आपल्या प्राणांची बाजी लावून या संकटाशी थेट मुकाबला करताहेत. अशा गंभीर परिस्थितीत, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना 'देशद्रोही' ठरवून कठोर शासन करण्याची मी सरकारला विनंती करतो."




मालेगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टरांना धक्काबुक्कीची घटना बुधवारी (25 मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मालेगावमधील महेशनगर भागातील माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आले होते. या आरोपीच्या उपचाराचा कालावधी का वाढवण्यात येत आहे, अशी विचारणा करत रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह इतर डॉक्टरांना, एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी मागणी करत कामबंद आंदोलन सुरु केलं.

Curfew | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण


बीडमध्ये पोलिसांना विटांनी मारहाण
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावात ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.


Malegaon Doctor Beaten | एमआयएम आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की


Curfew In Maharshtra | बीड | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण