रत्नागिरी : पुण्याील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला पाडव्याच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. ही बाब कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर आता रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट आले आहेत. या 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर उर्वरित 13 जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही. सध्या तरी रत्नागिरीत एक जण कोरोनाबाधित असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती देखील सुधारत आहे. तर, त्याच्या पत्नी आणि भावाचे रिपोर्ट देखील यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.


कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी भारत दुसऱ्या स्टेजवर कोरोनाशी सामना करत आहे. सारी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा मात्र या काळात सुरळीत सुरु राहणार आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असून देशवासियांनी सहकार्य करावे असं आवाहन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शिवाय, राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतलेल्या निर्णयांचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पण, यामध्ये नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे.


जिल्ह्यात कशी घेतली जात आहे काळजी?
जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सध्या लॉकडाऊननंतर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सहकार्य करावं असं आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून त्याकरता स्वयंसेवी संस्थाची देखील मदत घेतली जात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 11 संशयित क्वॉरन्टाईन असून जिल्ह्यातील होम क्वॉरन्टाईनची संख्या ही 639 इतकी आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांना सक्तीने स्वत:च्या घरात राहण्यास सांगितले आहे. तर, घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कलम 144 अंतर्गत आतापर्यंत जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी पोलीस, वाहतूक पोलीस जातीनं लक्ष ठेवून आहेत.


चाकरमान्यांचा गावाकडे कल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर आता मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये असलेले चाकरमानी सध्या गाव जवळ करताना दिसत आहेत. चारचाकीला बंदी असल्याने बाईकला पसंती दिली जात आहे. पोलिसांची नजर चुकवत जिल्ह्यातील इतर अंतर्गत रस्ते वापरले जात आहेत. शिवाय, काही जण समुद्रामार्गे बोटीने देखील गावात दाखल होत आहेत. पण, या साऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या कामगिरीबाबत नागरिकांनी कौतुक केले आहे.


Coronavirus | अखेर 'त्या' दाम्पत्याचा गुढीपाडवा गोड; दोन टेस्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज