Raigad Pind Daan: किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ पिंडदान होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत पिंडदानाचे विधी सुरु असल्याचं दिसत आहे. हे सुरु असताना काही शिवप्रेमींनी याला विरोध केला, त्यानंतर व्हिडीओत दिसत असलेली लोक तिथून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे. यातच पिंडदानाच्या कार्यक्रमा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडमार्फत करण्यात येत आहे.
  
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी किल्ले रायगडावर (Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याचदरम्यान, किल्ले रायगडावरील (Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ असलेल्या जागेवर पिंडदान कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) कोकण प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. आता या संपूर्ण प्रकणाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यासंदर्भात अद्यापी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 


दरम्यान, या संदर्भात महाराजांचा अवमान होईल अशा प्रक्रिया राबविल्या जात असून हे वारंवार घडत असून शासनाने यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तर पुरातत्व विभागाने या समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून स्थानिक शिवप्रेमींनी अशा समाजविघातक घटना थांबवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच शासनाने याकडे दुर्लक्ष न करता या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे असून यासंदर्भात संभाजी ब्रिगेडमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची भेट घेण्यात येणार आहे. 



या व्हायरल व्हिडीओ संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया


पिंडदानावाच्या या व्हिडीओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, याची माहिती घेतली जाईल. तसेच जर कुठलंही चुकीचं काम तर त्यावर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले आहेत. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर या घटनेवर पुढे कोणती कारवाई होणार का? हे पाहावं लागणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


आयएएस अधिकारी नसतानाही पालिका आयुक्तपदी निवड कशी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका
महिलांच्या वेशातील भामट्यांचा चोरीचा प्रयत्न, घरात घुसून मुलीचा गळा दाबला, गावकऱ्यांनी दिला चोप