सिंदुदुर्ग : जिल्हातल्या मालवण येथे राज्य स्तरीय जलतरण स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या ढिसाळ नियोजनामुळे आज एका स्पर्धकाला जीव गमवावा लागला आहे. आज स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन जण बुडाले, त्यापैकी अर्जन वराडकर या मुंबईकर स्पर्धकाचा मृत्यू झाला आहे. तर एका स्पर्धकाला स्थानिकांनी वाचवून रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.

अर्जुन आणि अजून एक स्पर्धक बुडाल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था नसल्याने रुग्णवाहिकेची वाट पाहत बसावे लागले. परिणामी दोघांनाही उशीरा रुग्णालयात दाखल केले गेले. रुग्णालयात अर्जुनला मृत घोषित करण्यात आले.

ढिसाळ नियोजनामुळेच अर्जुनचा मृत्यू झाल्याचा आरोप वराडकर कुटुंबीयांनी केला आहे. वेळेत रूग्णवाहिका आली असती तर अर्जुनचे प्राण बचावले असते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान काल याच स्पर्धेत सुरेखा गलांडे या महिलेचा सरावादरम्यान मृत्यू झाला असल्याने या स्पर्धेच्या आयोजकांवर टीका केली जात आहे. दोन स्पर्धकांच्या मृत्यूमुळे स्पर्धेला गालबोट लागले असल्याचे बोलले जात आहे.