जळगाव : जगातील सर्वात उंचीवरून म्हणजेच एव्हरेस्ट शिखर पार करत करून आलेल्या राजहंस पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील अनेक जलाशायांवर दर्शन घडू लागल्याने त्यांच्या निरीक्षणाची संधी पक्षीमित्राना मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात विविध ऋतूंमध्ये 95 प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येत असतात. अशाच प्रकारे स्थलांतर करून आलेल्या सुंदर अशा राजहंस पक्षाचे सध्या जळगाव जिल्ह्यातील बहुळा, हतनूर, भोकरबारी यांसारख्या जलाशयांवर दर्शन घडू लागले आहे.
साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतात मुक्काम असतो. यंदा मात्र राजहंस पक्षाचे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देखील दर्शन घडत असल्याने पक्षी निरीक्षकांना त्यांच्या या लांबलेल्या मुक्कामाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. राजहंस पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंचीवरून म्हणजेच एव्हरेस्ट शिखर पार करून हा भारतात येत असल्याचे पक्षी निरीक्षकांचे मत आहे.
शेतातील आणि पाण्यातील कीटक हे राजहंसाचे प्रमुख खाद्य आहे निसर्गाच्या साखळीमध्ये जमीन आणि पाण्यातील कीड नियंत्रणाची अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असतो. पाण्यात आणि जमिनीवर चालताना देखील हे पक्षी एका लयबद्ध रीतीने चालत असल्याने, ते आपलं सहज लक्ष वेधून घेत असतात. हिमालय आणि सैबेरियात बर्फ पडण्यास सुरुवात झाल्यावर खाद्याच्या शोधत ते भारताकडे स्थलांतर करीत असल्याचे पक्षी निरीक्षकांचे मत आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक जलाशये या पक्षाला अनुकूल असल्याने महाराष्ट्रात खानदेशातील अनेक जलाशयावर 20-25 पक्षांच्या थव्याच्या रुपात हे पक्षी बघायला मिलतात.