पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज होणाऱ्या चौकशी समितीसमोर सदाभाऊ हजर राहणार नाहीत. त्यामुळे 21 जुलैला होणाऱ्या बैठकीत सदाभाऊंचा फैसला होणार आहे.


सदाभाऊ खोतांना स्वाभिमानीतून घरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने सदाभाऊ खोत यांना नोटीस पाठवून, पुण्यातील शासकीय विश्रामगृहात 4 जुलै रोजी हजर राहण्याची सूचना दिली होती.

स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली. त्यांचं वर्तन संघटनेच्या हिताला धोका पोहोचवणारं आहे, असा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

या चार सदस्यीय समितीने 4 जुलैपूर्वीच चर्चा करुन निर्णय घ्यावा, असा बैठकीत ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे 4 जुलैला सदाभाऊंची बाजू ऐकण्यासाठी संघटनेने हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आता सदाभाऊच आज समितीसमोर हजर राहणार नाहीत.

दरम्यान, राजू शेट्टींच्या मनाचा थांग अजून लागलाच नाही. ज्या पद्धतीने मला संघटनेतून दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तो मला कळतोय. पण असं केल्यास मी राज्यभर दौरा करुन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये फूट अटळ आहे, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला आहे.

संबंधित बातम्या

स्वाभिमानीच्या चौकशी समितीची सदाभाऊंना नोटीस, हजर राहण्याची सूचना