नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली.
राजू शेट्टींसोबतच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा असूनही त्या प्रमाणात सत्तेत वाटा न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करून कार्यकर्त्यांची पिढी निर्माण करण्यासाठी स्वतंत्र लढणार असल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.
सर्वपक्षियांनी मिळून साखर कारखाने लुटले : राजू शेट्टी
राज्यात साखर कारखाने खरेदीच्या नावाखाली जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारला गेला असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
10 हजार कोटी किमतीचे 42 साखर कारखाने एक हजार कोटीत विकले गेले आणि आता अजून 13 कारखाने विकायला काढले आहेत, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला आहे.
या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. कारखान्यावर टाकलेल्या या दरोड्यांमध्ये अनेक पक्षांचे नेते सहभागी असून एकालाही सोडणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.