Raju Shetti : दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केला आहे. 


दोन वर्षांला अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे अधिकाऱ्यांकडून खडणी वसूल करतात, त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना जरी सातवा वेतन आयोग असेल किंवा पगार जास्त असला तरी त्यांनी मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेला पैसा तर शेतकऱ्यांकडून सर्वसामान्यांकडून वसूल करतात. प्रशासनातील अधिकारी काही साधू संत नाहीत तर शेतकऱ्यांना लुबाडतात असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 


माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्याबाबत विचारले असता राजू शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवा येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस परिषद आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमासाठी राजू शेट्टी यांची उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी बदल्यांच्या नावाखाली मंत्री हे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला. सातव्या वेतन आयोगाच्या पगारातून या खंडण्या देणं अधिकाऱ्यांना शक्य नाही, त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना लुटतात, त्याचं ताज उदाहरण म्हणजे काल परवा नेवासा तालुक्यातील महसूलच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी केल्याचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, आज झालेल्या ऊस परिषदेत एक रकमी एफ.आर.पी., मागील वर्षीची एफ.आर.पी. अधिक 300 रुपयांची मागणी करण्यात आली. सोबतच रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, सर्व कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावे, IAS तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्त पदी नियुक्ती करावी, शेती पंपाचे भारनियमन कमी करून विना कपात 12 तास वीज शेतकऱ्यांना मिळावी , ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी, अवसानातील पारनेर सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. राज्य सरकारने तातडीने या मागण्या पूर्ण कराव्यात असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. सोबतच येत्या 7 नोव्हेंबरला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आणखी वाचा :
Raju Shetti : मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा