बीड : बीडमधील एका मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने वीस वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याच नराधमाच्या शिक्षेचा निर्णय झाला त्यादिवशी 2 पोलिसांनी चक्क हॉटेलमध्ये आरोपीसोबत पार्टी केल्याचं समोर आलं होतं. या ओली पार्टीचे स्टिंग ऑपरेशन एका वृत्तपत्राने केले होते. याप्रकरणी या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सहायक फौजदार नामदेव धनवडे व हवालदार सत्यवान गर्जे या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


एका मूकबधिर मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या तुकाराम कुडूक या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तुकाराम कुडुकला न्यायालयामध्ये हजर करणारे दोन पोलिसच त्याच्या सोबत एस पी ऑफीस जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चक्क दारू पीत बसले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 

हे ही वाचा - मुंबईचे भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढांसह चौघांविरोधात खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल


हे प्रकरण समोर आल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.


हे ही वाचा - एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल 


या संदर्भात प्राथमिक अहवाल प्राप्त होताच गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस अमलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले. विशेष म्हणजे निलंबित केलेले दोन्ही पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालयात नेमणुकीला होते. न्यायालयात आरोपी बंदोबस्त आणि पैरवी अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीसोबत खाकी वर्दीवर राजरोस मद्यपार्टी करणे त्यांना भोवले आहे. या प्रकरणाची चर्चा बीड जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.