मुंबई : राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं असताना पाकिस्तानी साखर आयात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखरेचे दर कोसळत असतांना मुंबईच्या वेशीवर हजारो क्विंटल पाकिस्तानी साखरेच्या गोण्या दाखल झाल्याचं समोर येत आहे. ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं पेटवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.


राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकारने केल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच ही साखर विकत न घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. ज्या गोदामात ही साखर सापडेल त्याला आग लावण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

काही वस्तूंच्या निर्यातीनंतर त्या बदली एखादी वस्तू काही प्रमाणात विनाशुल्क आयात करता येते. केंद्र सरकारचं तसं धोरण आहे. त्याचाच फायदा मुंबईतील एका उद्योग समुहाने उचलला आहे आणि हजारो क्विंटल पाकिस्तानी साखर आयात केली आहे. दरम्यान पाकिस्तानी साखर ही भारतातील साखरेपेक्षा स्वस्त आहे.

भारतीय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची साखर आयात करण्याचं धोरण सरकारने आखलं आहे. मात्र ही साखर भारतात विकू देणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठाऐवजी पाकिस्तानी साखर चोळण्याचं काम केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.