शिर्डी : मध्य प्रदेशमधील इंदोर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत स्पष्ट शब्दांत तीव्र नापसंती व्यक्त करत फटकारले आहे. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असा आदेशही न्यायालयाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एबीपी माझाने 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं.

इंदूर येथील दीप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर 220 पाणी अहवाल निरर्थक ठरवला आहे.

कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही. मात्र पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अतिशय निष्काळजीपणे या गंभीर प्रकरणाचा तपास केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी

2017- 71 बेपत्ता- 20 तपास बाकी
2018- 82 बेपत्ता- 13 तपास बाकी
2019- 88 बेपत्ता- 14 तपास बाकी
2020- 38 बेपत्ता- 20 तपास बाकी

शिर्डीत दररोज लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात त्यात बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा असून बेपत्ता महिलांमध्ये विवाहित महिला व मुलींचे मोठे प्रमाण असून हे बहुतेक सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत. दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र अनेकांचा शोध सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे.