Maharashtra Political News : सध्या ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे (Vaijanath Waghmare) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे हे घटस्फोटानंतर एकमेकांपासून वेगळे राहतात.
अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. त्यावेळी मी सुषमा अंधारेंच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे, असं अॅड वैजनाथ वाघमारे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. तसेच, सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हापासून आमचा काहीही संबंध नाही, असंही ते म्हणाले आहेत.
अॅड वैजनाथ वाघमारे बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडाडीचं नेतृत्व आहे. सर्वसामान्यांसाठी ते काम करतात. तसेच, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका असणारा हा मुख्यमंत्री असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "यापूर्वी सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा म्हणून मी काम केलंय, पण माझा राजकीय वारसा अजिबात नाही. पण माझ्या गावाला राजकीय वारसा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उस्ताद लहुजी साळवे, वासुदेव बळवंत फडके यांच्याकडून प्रेरणा घेत समाजाला न्यायिक भूमिका समजावण्याचं काम मी आणि सुषमा अंधारेनं सोबत केलंय"
सुषमा अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानं नात्याला तडे : वैजनाथ वाघमारे
"सुषमा अंधारे आणि मी विचारानं वेगवेगळे आहोत. गेली पाच ते सात वर्ष आमचा कसलाही काही संबंध नाही. त्यांची आणि माझी कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय प्रश्नावर चर्चा नाही.", असं वैजनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केलं. तसेच, सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीत जायला नव्हतं पाहिजे. राष्ट्रवादीत एक भाडोत्री वाहन म्हणून त्या गेल्या. त्यानंतर आमच्या खऱ्या नात्याला तडा गेला. तेव्हापासून त्यांचे विचार वेगळे राहिले आणि आमचे विचार वेगळे राहिले.", असं वैजनाथ वाघमारे म्हणाले.
"मला सुषमा अंधारे यांना नेताच करायचं होतं. झोपडपट्टीत, ऊसतोड कामगार किंवा वीटभट्टीवर काम करायला पाठवायचं नव्हतं. पण त्यांनी निर्णय घेतला आणि तो मला पटला नाही त्यामुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.", असं ते म्हणाले. "तोफ वैगरे अजिबात नाही. ठाकरे गटात जरी गेल्या असल्या तरी त्या तोफ आहेत की, नाही. त्या काय आहेत? हे येत्या काही दिवसांत ज्या मंत्र्याबाबत काही दिवसांपूर्वी त्यांनी वक्तव्य केली होती. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे कोण आहेत, काय आहेत? कुठून आल्या? याचा उलगडा करणार आहे.", असंही ते स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं.