Sushma Andhare News: ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णय स्वातंत्रचा आदर केला पाहिजे, मी त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देते, असं म्हटलं. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी लेकीच्या नावानं एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ओळींचा संदर्भ देत अंधारे यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सोबत लेकीचा एक फोटोही टाकला आहे.  
 
सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रिय कब्बू, तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.  बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता.  पण अख्खं कुटुंब पाठिशी उभा राहिलं. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला.  दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. 


बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी  लढायचं ठरवलंय..! 


तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात,. 


बाबासाहेब लिहितात, "जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत.  त्यांच्या धाक दपटशा  आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा"- अशी पोस्ट सोशल मीडियावर सुषमा अंधारे यांनी केली आहे. 


अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश 


ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले आहेत की, येणाऱ्या काळात सुषमा अंधारे असू दे की कोणी असू देत, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार. तसेच सुषमा हिने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हा पासून आमचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.