मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागपुरात तसे संकेत दिलेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत या प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलीय.
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावानं आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न खासदार शेवाळे यांनी लोकसभेतल्या भाषणादरम्यान उपस्थित केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए यू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आदित्य-उद्धव असल्याचं खळबळजनक वक्तव्य राहुल शेवाळे यांनी सभागृहात केलंय. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे. नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा. 8 जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? Cctv का गायब झाले? visitor book चे त्या 2 दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहे
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडात खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळं सध्या ते शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आहेत. आपण आदित्य ठाकरे यांच्यावर कोणताही आरोप केला नसून, एयू म्हणजे नेमकं कोण एवढाच प्रश्न आपण विचारल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण हा प्रश्न उपस्थित करण्यामागे राहुल शेवाळे यांचा नेमका हेतू काय होता, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.