मुंबई :  रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज प्रकरण हे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलेलं आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक यांनी ड्रग्स पेडलर्सकडून अनेकदा गांजा  खरेदी करून सुशांतला दिला होता. असा थेट आरोप केंद्रींय अमली पदार्थ नियंत्रण विभागानं (एनसीबी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात केला आहे. एनसीबीनं दिलेल्या आरोपांचा मसूदा नुकताच जाहीर झाला असून लवकरत रियासह अन्य आरोपींवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पाडली जाईल.


काय आहे प्रकरण?


बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांशी संबंधित एक काळी बाजू समोर आली आणि एनसीबीनं चित्रपट, टिव्ही वाहिन्यांशी संबंधित लोकांशी यासंदर्भात चौकशी सुरू केली. सुशांतची मैत्रिण रिया आणि तिचा भाऊ शौविकला अन्य ड्रग्स पेडलर्ससोबत याप्रकरणात अटक करण्यात आली. त्यापैकी बरेचसे आरोपी हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. एनसीबीनं मागील महिन्यात या प्रकरणाशी संबंधित 35 आरोपींविरोधात विशेष एनडीपीएस न्यायालयात निश्चित होणा-या आरोपांचा मसुदा दाखल केला होता. 


 एनसीबीनं लावलेले आरोप 


या मसुद्यातील आरोपांनुसार, सर्व आरोपींनी मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीदरम्यान उच्चभ्रू समाज आणि बॉलीवूडमध्ये ड्रग्स खरेदी, विक्री आणि वितरण करण्याचा कट रचला होता. आरोपींनी अमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठा करून गांजा, चरस, कोकेन आणि अन्य अंमली पदार्थांची अवैधपणे विक्री केली. म्हणूनच सर्व आरोपींवर एनडीपीएस कलम 27 आणि 27(अ) (वित्त पुरवठा करणे आणि गुन्हेगारांना आश्रय देणे), कलम 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), कलम 29 (गुन्हेगारी, षडयंत्राला प्रोत्साहन देणे) यांसारख्या एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीने या प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स पेडलर्स सॅम्युअल मिरांडा, शौविक, दीपेश सावंतसह अन्य पडलर्सकडून विकत घेतलेला गांजा अनेकदा सुशांतला दिला आहे. शौविकच्या सांगण्यावरून तिने मार्च आणि सप्टेंबर 2020 पर्यंतचे अंमली पदार्थांचे पैसेही दिल्याचा आरोप एनसीबीनं लावलेला आहे. रियाचा भाऊ शौविक अंमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता. तो त्यांच्याकडून गांजा आणि चरसची ऑर्डर घेत असे आणि सुशांतकडे सुपूर्द करत असल्याचंही एनसीबीनं आरोपांच्या या मसुद्यात म्हटलेलं आहे.


 निर्माता क्षितिज प्रसादकडून दोषमुक्तीसाठी अर्ज


सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी क्षितिज प्रसादने विशेष न्यायालयातदोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. क्षितिजला पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे. मात्र, 'या प्रकरणात मला नाहक ओढले असून मी अंमलीपदार्थ घेत नाही. केवळ अन्य एका आरोपीच्या व्हॉट्सअँप चॅटमध्ये उल्लेख झाला म्हणून आपल्यावर कारवाई केली' असा बचाव त्यानं केला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्यावर करण जोहर, अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूरचा उल्लेख करण्यात दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्याने केला होता. मात्र, क्षितिजच्या या सर्व आरोपांचे एनसीबीने खंडन केलेलं आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. जी रघुवंशी यांच्यासमोर 27 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे.