बीड : भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी बीड-लातूर-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर दणदणीत विजय मिळवला. विजय मिळवल्यानंतर उस्मानाबादमधून निघालेले सुरेश धस आज दुपारी थेट परळीत पोहोचले आणि गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.


कधीकाळी सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य होते. सुरेश धस यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात केली. त्यानंतर भाजपातून बंडखोरी करुन ते राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल झाले. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. एकेकाळी गुरु-शिष्य असलेली हे जोडी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले.

लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणंही बदलत गेली. पंकजा मुंडेंचं नेतृत्व मान्य करत सुरेश धस यांनी बीड जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात भाजपशी जवळीक साधली. स्वतःकडील जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देऊन राष्ट्रवादीच्या तोंडाशी आलेला सत्तेचा घास सुरेश धस यांनी हिसकावून घेतला.

त्यानंतर लातूर-बीड -उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी घेऊन सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. या विजयाचा गुलाल अंगावर घेऊनच सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तो परळीमधून आणि गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आगामी राजकारणाची सुरुवात केली.

होमग्राऊंडमध्ये धनंजय मुंडे यांना या निकालाने जोरदार धक्का बसला आहे. यामुळेच येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी सुरेश धस यांची ही सुरुवात आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. एवढंच नाही, तर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन सुरेश धस यांनी आगामी राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडली : शरद पवार

‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

विधानपरिषद: संख्याबळ नसूनही सुरेश धस कसे जिंकले?