मुंबई : अंबाजोगाई मधील बालाजी रूद्रवार हा आपल्या कुटुंबासह नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत न्यू जर्सी येथे वास्तव्य होता. मात्र बुधवारी रात्री त्यांचा व पत्नीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आत्महत्या की खून अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे या प्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाचं लक्ष वेधले आहे. तसेच केंद्र सरकारने या घटनेत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.


सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या,  न्यू जर्सीमध्ये घडलेल्या बालाजी रुद्रवार आणि त्यांच्या पत्नीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भारतीय परराष्ट्र खात्याने लक्ष घालत त्याची सखोल चौकशी करावी. तसेच अमेरिकेत अडकलेल्या रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय चिमुकलीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती व्यवस्था करावी.





>


 बालाजी हा अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाला होता. दरम्यान बुधवारी (7 एप्रिल) सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी दाखल झाल्यावर त्यांना घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. भारतीय वेळेनुसार गुरुवारी (8 एप्रिल) सकाळी नऊ वाजता स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरुन माहिती दिली. या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत.


बालाजीचे कुटुंबीय अंबाजोगाईत आहेत. रुद्रवार दांपत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.