पंढरपूर: शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या.


शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले.

शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिवाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, पारदर्शी मुख्यमंत्री राज्यातील माध्यमांना न्याय देतील असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कर्जमाफीबाबत सरकारवर ताशेरे ओढताना, आपल्याला कर्जतमध्ये एक तरुण भेटला, कर्जमाफीसाठी कागदे गोळा करायला त्याने 400 रुपये खर्च केले आणि त्याच्या 2 खात्यात केवळ 130 रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली, असं सांगत आपण हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असून, या सरकारने दिलेला शब्द पाळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, या जाहिराती बनवणारा पठ्ठ्या कोण?