मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP)  महिला पदाधिकारी मेळावा वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे.  मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर (Supriya Sule) रोष व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादीचे कार्यक्रम, दौरे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही अशी तक्रार सुप्रिया सुळेंकडे करण्यात आली.  तर यापुढे महिला अध्यक्ष माझ्या गाडीत बसतील आणि माझ्या कार्यक्रमात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असेल असा थेट निर्णय सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे.  


सुप्रिया सुळे म्हणाल्या, आगामी काळात दोन महत्वाच्या निवडणुका आहेत. पुढील 12 महिने आपल्यासाठी महत्त्वाचे असणारं आहेत. राज्याची सध्याची परिस्थीत गंभीर आहे. एक काळ असा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की काहीतरी भूकंप होणार अशी चर्चा असायची. आत्ताचे मुख्यमंत्री दिल्लीत पालकमंत्री ठरवायला जातात. पालकमंत्री ठरवायला जाण्यासाठी दिल्लीला जायला वेळ होता.  माञ त्यांना नांदेडला जायला वेळ नव्हता.


पुणे मेट्रोला माझा विरोध नाही


पुणे मेट्रोवर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा मेट्रोला विरोध नाही परंतु पुण्यात मी आधी पीएमटी आणि एसटी महामंडळ चांगल केलं असते.  मी पैसा तिथं घालवला असता आता नागपूरमध्ये मेट्रो तोट्यात आहे. तिथं मेट्रोत फॅशन शो वाढदिवस साजरे होतात. पत्ते खेळले जातात.या सरकारच्या काळात शाळा बंद झाल्या आणि दारूचे दुकाने वाढले आहेत.


सत्तेत आल्यावर अवैध बॅनरबाजी बंद करणार


सध्या बॅनरचे वाद चालू आहेत. आपण सत्तेत आलो की अवैध बॅनरबाजी विरोधात एक ऑर्डर काढू आणि ते बंद करून टाकू. आम्ही अचानक बोलावलेल्या अधिवेशनाला गेलो तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की परंतु झालं काहीचं नाही. महिला विधेयक मांडले परंतु ते लागू 2027 नंतर होणारं आहे. तुमच्या नावे चेक लिहलेला आहे, सही देखील केली आहे माञ त्यावर किंमत लिहलेले नाही असा तो प्रकार आहे. अजून दहा वर्षांनंतर आरक्षण लागू होणार आहे. यांनी स्वतःच्या हट्टासाठी अधिवेशनासाठी 25 कोटी रुपये वायाला घालवले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


भाजपकडे कुणी हुशार माणसे नाही म्हणून...


देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे. मात्र भाजपकडे कुणी हुशार माणूस नाही त्यामुळं त्यांना इकडून माणसं घ्यावी लागत आहेत, असे सुप्रीया सुळे म्हणाले. अजित पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आनंद आहे की त्यांचे हेगडेवार कमी होतं आहेत आणि तिकडं देखील यशवंतराव चव्हाण यांचा विचार वाढत आहे.