Supriya Sule : मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल. त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. राजीनामा हा पर्याय नाही, त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड एक चांगले लोकप्रतिनिधी असल्याचेही त्या म्हणाल्या.
जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती
जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील लोकांनी विश्वासाच्या नात्यानं त्यांना निवडून दिलं आहे. अतिशय चांगलं काम ते करत आहेत. एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. त्यामुळं त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती यावेळी सुळे यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. सध्या राजकारण कुठल्या पातळीला जात आहे याची चिंता वाटत असल्याचेही सुळे म्हणाल्या.
अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल
मी तीन चार वेळा तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यामध्ये एक गोष्ट जावणली की, ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळच झाली आहे. दुसरी गोष्ट तिथे प्रचंड गर्दी होती. एवढी मोठी गर्दी असताना जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला बाजूला सारले, अनावधानाने त्या महिलेला धक्का लागला असेल. हा विनयभंग कसा होऊ शकतो असेही सुळे यावेळी म्हणाल्या. तरीसुद्धा त्या महिलेची बाजू आपण एकून घेतली पाहिजे. पण पोलिस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार दाखल करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच
माझे वडील मुख्यमंत्री असताना मी मुंबईत बस आणि ट्रेनमधून फिरले आहे. मुंबईत बस आणि ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यावेळी धक्काधक्की होत असते. मोठी गर्दी असेल तर असा धक्का लागतो. मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच असल्याचे सुळे म्हणाल्या. दरम्यान, माझं जितेंद्र आव्हाड यांच्याशी सकाळी बोलणं झालं असल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या. जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. हे नेमकं का केलं जातय? असे सुळे यावेळी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: