Supriya Sule: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून 200 डॉलर्सची मागणी तर पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा अकाउंट हॅक करणारा तरुण बिहार राज्यातील असल्याचे सूत्रांची माहिती आहे. या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. 


गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन रविवारी हॅक करण्यात आल्याचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. यानंतर त्यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. काही तासातच त्यांचा फोन आणि व्हाट्सअप पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आलं होतं.


फोन आणि व्हाट्सअप हॅक करून केली पैशांची मागणी 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचं व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरून 200 डॉलरची (साधारणतः 16000 रुपये)  मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी केल्याचं कळतंय.


अकाउंट हॅक करणारा तरुण बिहारचा 


खासदार सुप्रिया सुळेंसह पदाधिकाऱ्यांचा व्हाट्सअप अकाउंट हॅक करणार तरुण बिहार राज्यातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. भालकेश कुमार नावाच्या व्यक्तीकडून फोन पे च्या माध्यमातून पैशांची मागणी झाली असून या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.


सुप्रिया सुळेंनी काय लिहलं आहे सोशल मिडीयावर?


त्यांचे वॉट्सॲप पूर्ववत झाल्याचे त्यांनी x माध्यमावर पोस्ट केले. त्यात त्या म्हणाल्या...माझा फोन आणि व्हॉट्सॲप सुरू झाले आहेत. व्हॉट्सॲप टीमने मोलाचे सहकार्य केले. यासाठी टीम व्हॉट्सॲप आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे खूप खूप आभार. यादरम्यान मला जर कोणी मेसेज केला असेल, तर या तांत्रिक बिघाडामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगीर आहोत,” सुळे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.