बारामती  : दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण देशात अस्वस्थता असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सातत्यानं सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोललं जात होतं. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही. पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते. हे सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे.. केवळ भाषणापुरतंच 56 इंच छाती असल्याचं सांगितलं गेलं. नोटबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असंही सांगण्यात आलं.  मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप
केंद्र आणि राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य शासनानं आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्यानं हा विषय रेंगाळत  पडल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत धनगर समाज आरक्षणाबद्दलची बैठक निष्फळ ठरली आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी याबद्दल आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलं. बारामतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हाच हे फसवं आश्वासन असल्याचं जाणवलं होतं.  राज्य सरकारनं आजपर्यंत धनगर आरक्षण प्रस्तावाचा एकही कागद दिलेला नाही.केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकार केवळ या कष्टकरी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

हे सरकार कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला यांच्या हिताविरोधातलं सरकार आहे.. त्यांना आजतागायत या घटकांचे प्रश्नच समजत नाहीत. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं आहे. सरकारच्या धोरणांमुळेच हा देश विकासात मागे पडल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. चुकीचं काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशात आणि राज्यात महाआघाडी करुनच निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.