मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Snajay Raut) यांच्यावर हल्लाबोल करताना अनेक गौप्यस्फोट केले. संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करताना, सामना वृत्तपत्रात त्यांचा सिंचनदादा असा उल्लेख केला. त्यामुळे अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतला.
'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM ) भेटले, त्यावेळी ते चलबिचल झाले होते. त्याचवेळी ते भाजपसोबत जाण्याच्या विचारात होते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला. संजय राऊतांनीच त्याबाबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मला ही माहिती दिली होती', असं तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे काय म्हणाले?
'सामना अग्रलेखात अजित पवार यांच्यावर टीका केली. मागील 2 महिने सातत्यानं संजय राऊत बोलत आहेत. त्यांचा पक्षांतर्गत जे काही बोलायचं आहे ते बोलावं. परंतु आमच्यावर टीका करू नये. अजित पवार यांचा सिंचनदादा म्हणून उल्लेख करत आहेत. संजय राऊत माझ्याशी याआधी देखील बोलत होते. त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय कामाबाबत बोलायचे. अजित पवार चांगले काम करतात असं म्हणायचे', असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
'उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेऊ नये. दिल्लीत पंतप्रधानांची भेट उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी अजित पवार गेले नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना राग आला होता. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांना संजय राऊत म्हणत होते की पंतप्रधान यांच्यासोबत भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनाची चलबिचल झाली होती. त्यांच्या मनात पुन्हा भाजपसोबत जावं असं होतं, असं राऊतांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी माझ्यावर देखील अनेकवेळा टीका केली होती. संजय राऊत यांनी शरद पवार आजारी असताना 3 ते 4 महिने उद्धव ठाकरे भेटायला गेले नव्हते, याबाबत नाराजी माझ्याकडे व्यक्त केली होती.'
'उद्धव ठाकरेंवर भाजपमध्ये जायची वेळ आली होती'
एका बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नाही म्हणून संजय राऊतांना राग आला होता. त्यावेळी नार्वेकर, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये राऊत दीड ते दोन तास हेच सांगत होते की उद्धव ठाकरेंवर भाजपमध्ये जायची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतरची ही गोष्ट आहे.