रायगड : अजितदादा बारामती सोडून इतर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू असताना त्यावर आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा आणि बारामती हे संबंध गेल्या 40 वर्षांपासून अतूट आहे. त्यामुळे अजितदादा बारामतीतूनच लढणार सांगतो असं वक्तव्य तटकरे यांनी केलं. त्या आधी खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही दादांची बारातमीतून उमेदवारी जाहीर केली होती. आता सुनील तटकरे यांनीही त्यावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय.
सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादा बारामती सोडून इतर मतदारसंघातून लढणार हे वृत्त निराधार असून कुणीतरी जाणीवपूर्वक ते पसरवत आहे. अजितदादांनी बारामतीतून लढावं ही इच्छा कार्यकर्त्यांची नाही तर बारामतीच्या जनतेची आहे. अजितदादा हे बारामतीच्या विकासाचे महामेरू आहेत. त्यामुळे ते बारामतीतूनच लढतील हे मी सांगतो.
शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. त्याचवेळी लोकसभेनंतर अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली होती. आतापर्यंत बारामतीतून निवडून आलो, पण आता बारामतीकरांनी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी. मग मी काय काम केलं ते त्यांना समजेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळेच अजित पवार हे बारामतीतून लढणार नाहीत, इतर कोणत्यातरी मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या वक्तव्याने जवळपास पडदा टाकला असून अजित पवार हे बारामतीतूनच लढतील हे निश्चित झालं आहे.
रामराजेंचं काही ठरलं नाही, ते जाणार नाहीत
फलटणचे रामराजे निंबाळकर हे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, रामराजेंचा तसा कोणताही निर्णय झालेला नाही. अजितदादा हे कोल्हापूरला जाणार असून त्यावेळी ते रामराजेंची भेटही घेणार आहेत. त्यामुळे येत्या पाच सहा दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. निवडणूक जवळ आल्या की इकडे तिकडे होतच असतं.
कागलच्या वादावर काय म्हणाले तटकरे?
कागलमधून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर काय चर्चा होतात हे काहींना माहीत नसावेत. त्यामुळेच त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या महायुतीचे जागा वाटप फार पुढे गेला आहे. राहिलेल्या जागा वाटपाबाबत येत्या चार दिवसात तिढा सुटेल.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळेच साहजिकच भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: