Sudhir Mungantiwar on Maharashtra Politics : राज्यात ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) अन्य काही तांत्रिक मुद्यांमुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका (Maharashtra Eections) रखडल्या आहेत. आता नवं शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) आल्यानंतर तरी निवडणुका होतील का? असा सवाल केला जात असताना सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं वक्तव्य करत निवडणुका होण्याबाबत संकेत दिले आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुका होतील, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात एबीपी माझाशी बोलत होते. 


मंत्रिमंडळ नव्हते तेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतच होते


ते म्हणाले की, चर्चा करणारे आमची सत्ता आली हेच पचवू शकत नाहीत.  राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्या विचारतात एकही महिला मंत्रिमंडळात नाही. मात्र मविआचे पहिले मंत्रिमंडळ बनले, तेव्हा एकही महिला मंत्रिमंडळात नव्हती. त्यामुळे पॉलिटिकल अल्झायमर होता कामा नये. मंत्रिमंडळ नव्हते तेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतच होते, असंही मुनगंटीवार म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच OBC आरक्षणाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या आता पर्यंतच्या सर्व बैठकात आम्ही भरभरून निर्णय घेतले. आधीच्या सरकारच्या सुरुवातीच्या बैठकीत कोणतेही निर्णय झाले नव्हते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अनेक वेळेला घोषणा केली मात्र पूर्तता केली नाही, असा आरोपही मुनगंटीवारांनी केला. 


आता भिंती बोलू शकत नाहीत
मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना आमच्याशी आणि जनतेशी बेइमानी करून सत्तेत आली. एक कपोलकल्पित कहाणी सांगितली की आम्हाला अडीच वर्षांचा शब्द दिला गेला होता, आता भिंती बोलू शकत नाहीत.  प्रचारात भाजपचा मुख्यमंत्री असे मान्य करून प्रचार केला. निवडणुकीनंतर जेव्हा आमचे 105 आमदार आले, तेव्हा शिवसेनेविना सरकार येऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेना बदलली, मोलभाव सुरू केला, असंही ते म्हणाले.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेची नैसर्गिक आघाडी होती का?


मुनगंटीवार म्हणाले की, मविआ सरकार बसल्यानंतर शिवसेनेत उठाव झाला. जनता सर्व ओळखते. कितीही विषारी प्रचार केला तरी काहीही होत नाही. आमच्यात एक वाक्यता आहे. शिंदे आणि फडणवीस एकत्रित काम करत आहे. दोन पक्ष नाही, तर एकच पक्ष आहे.जनतेच्या हिताचा पक्ष आहे, असंही ते म्हणाले. नाना पटोले आम्हाला अनैसर्गिक आघाडी म्हणत असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेची नैसर्गिक आघाडी होती का? असा सवालही त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सक्रिय विरोधी पक्ष आवश्यकच आहे. शरद पवार यांनी विरोधी पक्ष म्हणून सक्रिय होण्याची सूचना योग्यच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 


खातेवाटपावरुन होणाऱ्या आरोपावरुन ते म्हणाले की, मी तुम्हाला विधिमंडळ नियमांची माहिती देतो, खाते वाटप झाले नाही, तरी मंत्रालयाचे कामकाज थांबत नाही. मात्र, मुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले आहे की दोन दिवसात खाते वाटप होईल. हे भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे. दोन तृतीयांश बहुमताने शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन निघाले आहे. कितीही कोणी ही प्रयत्न केले, तरी भाजप आणि शिवसेनेचे सरकारमध्ये दुरावा निर्माण होणार नाही, असंही ते म्हणाले.पवार हे संकल्प करणारे नेते आहेत.  शरद पवार यांचे संकल्प होते, त्यांच्या पुतण्याचे, अजित पवार यांचा संकल्प आहे की मुख्यमंत्री व्हावे. मात्र, संकल्प जनतेने करणे महत्वाचे आहे, असंही ते म्हणाले.