खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 04 Jun 2016 06:38 AM (IST)
मुंबई: अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत. खडसे आजच राजीनामा देणार याबाबतची बातमी एबीपी माझाने सकाळीच दिली होती. खडसेंची मंत्रिपदं कोणाला? दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या जागी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता 'एबीपी माझा'कडे विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. खडसेंऐवजी विदर्भातील नेता आणि बहुजन चेहरा हे जाती-पातीचं, विभागाचं गणित सोडवण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर आहे. त्यामुळे विदर्भातील आणि बहुजन चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. तसंच ते 15 जून रोजी पदभार स्वीकारण्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र खडसेंकडील उर्वरित मंत्रिपदं कोणाकडे जाणार,याबाबतची उत्सुकता कायम आहे. मुनगंटीवारांनी वृत्त फेटाळलं दरम्यान, खडसेंकडील महसूलमंत्रीपद मिळण्याबाबतचं वृत्त सुधीर मुनगंटीवारांनी फेटाळलं आहे. सध्या मुनगंटीवारांकडे कोणती खाती? सध्या सुधीर मुनगंटीवारांकडे अर्थ आणि नियोजन तसंच वनमंत्रीपद आहे.