शिर्डी (अहमदनगर): मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन सरकारवर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या टोमणा लगावला.


मुनगंटीवार आज शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी काही गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा होत नाही. याचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव बुद्धी देवो असं म्हणत नाव न घेता मुनगंटीवारांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलंय.

एकनाथ खडसेंनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.

मुनगंटीवार काय म्हणाले?

"फाईल कुरतडू नये म्हणून काही औषधं ठेवली जातात. तीन-साडेतीन लाख टॅबेलट, ज्याची किंमत एक-दीड रुपये आहे, अशा सुमारे चार लाखाच्या टॅबलेट मंत्रालयात ठेवण्यात आल्या. त्यातून अर्थ असा काढण्यात आला की, जिथे एक टॅबलेट ठेवलीय, ती उंदराने खाल्लीच पाहिजे आणि तो मेलाच पाहिजे. आपल्याकडे कसा असा अर्थ काढला जातो, भगवान साईबाबा त्यांना सदबुद्धी देवो....अर्थ काढण्याचं काम सर्व राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी योग्य पद्धतीने केलं पाहिजे.

जिथे टॅबलेट ठेवल्या, तेवढे उंदीर मेले, तेवढ्या उंदरांची विल्हेवाट कशी लावली, तासाला किती उंदीर मेले....जेवढ्या टॅबलेट ठेवल्या तेवढे उंदीर मेलेच पाहिजे, असा अर्थ काढणं योग्य नाही", असं मुनगंटीवार म्हणाले.

आधीच जनतेचा व्यवस्थेवर विश्वास कमी झाला आहे, त्यातच असे वक्तव्य करुन विश्वास अजून कमी करु नका असा, अप्रत्यक्ष सल्ला मुनगंटीवार यांनी खडसेंना दिला.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणामुळे राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला हे खरं असलं तरी, आम्ही तो डोंगर कमी करण्यात यशस्वी झालो आहे. महसुली तुटीत सुद्धा आम्ही ऋणभार कमी केला आहे. कर्जाचा आकडा जरी जास्त दिसत असला तरी राज्याचे उत्पन्न त्या तुलनेत वाढलं आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप


VIDEO:



संबंधित बातम्या 

मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप


उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही