वर्धा : काँग्रेसचं इंजिन खराब झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसंच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील नवीन बसस्थानकाचं भूमिपूजन तर वर्ध्यात नवीन बसस्थानकाचं लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी ते स्वप्न काही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते. एवढे वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि फक्त मोदी हटावचा नारा देऊन निवडणुकीत प्रचार फक्त काँग्रेसने केला. गेल्या 47 वर्षांत काँग्रेसने कोणतीही विकासकामं केली नाहीत. जनतेला हे माहीत आहे त्यामुळे काँग्रेस आता पुढं जाऊ शकत नसल्याची टीकाही मुनगंटीवारांनी केली आहे.

पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच

पुढचा मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समान वाटप होईल. जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरवणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.