मुंबई : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपुढे ऑनलाईन प्रवेश घेण्याची व्यस्तता असताना जातपडताळणी प्रमाणपत्र प्रवेश घेताना सादर करण्याची अट जाचक असल्याची पालक आणि विद्यार्थ्यांची ओरड होती. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

शालेय आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत माहिती दिली. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र तातडीने सादर करावं लागतं. मात्र एकीकडे प्रवेश मिळवण्याची धडपड आणि दुसरीकडे कागदपत्रांची जुळवाजुळव अशी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते.

विद्यार्थ्यांना आता बायोमेट्रीक हजेरी

शिवाय राज्यातील विविध खाजगी क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना भुरळ पाडून अधिक शुल्क आकारुन इंटीग्रेटेड महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्याची मुभा दिली जाते. या महाविद्यालयांना चाप लावण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती तावडे यांनी दिली. या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता सक्तीची बायोमेट्रीक हजेरी करण्यात येणार आहे.

बारावीच्या निकालानंतर आता पुढे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच सादर करावं लागेल, मात्र इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.