सांगली : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे गुरुजींवर जे आरोप केलेत, त्याचा निषेध करत सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाय भिडे गुरुजींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली.


याकूब मेमनशी तुलना करून भिडे गुरुजींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची जी मागणी करण्यात आलीय, त्याचा यावेळी कार्यकर्त्यांनी निषेध केला. गुन्हा मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

बुधवारी सांगली बंदवेळी मारुती चौकात संभाजीराव भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत असल्याने मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने पोलीस आणि प्रशासनाला दिला.

बंदमध्ये समाजकंटकांनी जाणीवर्पूक तोडफोड करुन लोकांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. यामध्ये एमआयएमचे कार्यकर्तेही घुसले होते, असाही आरोप शिवप्रतिष्ठानने केला. तसेच भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आलं आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या ठिकाणी जिल्हाधिकारी विजय काळम, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे उपस्थित होते.