सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला मालवणमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यात यशं आलं होतं. 






चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं


दरम्यान, महाराजांच्या पुतळा प्रकरणात चेतन पाटीलला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. चेतन पाटीलने दोन दिवसांपूर्वीच 'एबीपी माझा'शी संवाद साधला होता. त्यावेळी त्याने सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीशी माझा कोणताही संबंध नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते.या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. यापलीकडे मी पुतळ्याचे कोणतेही काम केलेले नाही. पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी ते पुरावे न्यायालयासमोर सादर करेन, असे चेतन पाटील म्हणाला होता.  


शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?


शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असताना, राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी तांत्रिक संयुक्त समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये सिव्हिल इंजिनीअर, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यासाठी देशातील सर्वोत्तम शिल्पकार, सिव्हिल इंजिनीअर, तज्ञ आणि नौदल अधिकारी यांची समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. नवीन भव्य स्वरूपात पुतळ्याची रचना सुचवण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स आणि आयआयटीचे प्रतिनिधी, सिव्हिल इंजिनीअर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिल्पकार आणि नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या