कोल्हापुरात नगराध्यक्षांनी शिक्षा दिल्याने शिपायाला हार्ट अटॅक
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2018 12:50 PM (IST)
आजरा नगरपंचायतीत शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना घडली. भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी शिपायांना नाश्त्याची सोय करण्यास सांगितलं होतं.
कोल्हापूर : नगराध्यक्षांनी दिलेल्या शिक्षेमुळे एका शिपायाला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार कोल्हापुरातील आजरा नगरपंचायतीमध्ये घडला आहे. सुरेश जाधव असं शिपायाचं नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजरा नगरपंचायतीत शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना घडली. भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी शिपायांना नाश्त्याची सोय करण्यास सांगितलं होतं. परंतु नाश्ता देण्यास उशीर झाल्याने शिक्षा म्हणून नगराध्यक्षांनी सुरेश जाधव यांच्यासह आणखी एका शिपायाला हात जोडून उभं राहण्याची शिक्षा दिली. मात्र शिक्षेमुळे अपमान झाल्याची भावना सुरेश जाधव यांच्या मनात आला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यानंतर नगरपंचायतीमधील इतर कर्मचाऱ्यांनी सुरेश जाधवांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. दुसरीकडे, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी केला आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचल्याचा दावा त्यांनी केला आहे.