नांदेड :  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याने कार्यालय परिसरात चक्क घोडा बांधण्याची परवानगी मगितली आहे. या अजब मागणीची चर्चा सध्या जिल्हाभरात चालू आहे. प्रशासनातील एखादया जबाबदार अधिकाऱ्यांने त्यातल्या त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील साहाय्यक अधिकाऱ्यांने कार्यालय परिसरात घोडा बांधू देण्याची जिल्हाधिकारी नांदेड यांना रीतसर परवानगी मागून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे.


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी सतीश देशमुख यांनी पाठीच्या माणक्याचा आजार असल्या कारणाने जिल्हाधिकारी परिसरात चक्क घोडा बांधू देण्यासाठी परवानगी मागितली आहे. देशमुख यांना दुचाकी चालवणे त्रासदायक होत असल्याने त्यांनी कार्यालयात घोडा घेऊन यायची अजब परवानगी मगितली आहे. कार्यालयात घोडा घेऊन आलो तर घोडा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा या अजब मागणीमुळे प्रशासकीय यंत्रणेची मात्र तारांबळ उडाली आहे.


पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याने या महाशयांना घोड्यावर येणे सोयीस्कर वाटले. आपल्या या मागणीमुळे काहीतरी गफलत झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी सदर अर्ज मागेही घेतला आहे. परंतु त्यांच्या या अजब मागणीची चर्चा मात्र जिल्हाभरात झालीय.सहाय्यक लेखाअधिकारी सतीश देशमुख यांच्या या अजब मागणीची माहिती घेणसाठी एबीपी माझाची टीम त्यांच्या गावी पोहचली.


जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या अधिकाऱ्याचं पुढं काय झालं?


हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असणाऱ्या त्यांच्या गावाचे नावही तसेच अजब आहे आणि ते ऐकून तुम्हालाही हसू येईल. कारण त्यांच्या गावाचे नाव ही चक्क "घोडा"असे आहे. सतीशरावांच्या अजब मागणीची आणि गावातील नावाची अचंबीत करणारी गंमत. त्यामुळे सतीश देशमुख यांच्या मागणी मागे या गावातील इतिहास ही कारणीभूत आहे. कारण पूर्वीपार या गावात मोठ्या प्रमाणात घोडे असल्या कारणाने गावाचे नाव घोडा पडले. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव असणाऱ्या या गावात बहुसंख्य लोकांकडे घोडे पहावयास मिळतात. घोडा गावाचे मूळ रहिवाशी असणाऱ्या सतीश देशमुख यांचे आई वडील भाऊ या गावात वास्तव्य करतात. वडील पंजाबराव देशमुख हे निवृत्त एस. टी महामंडळ कर्मचारी असून त्यांची आई गावच्या सरपंच आहेत. तर छोटे बंधू शेती व्यवसाय करतात. एकूणच देशमुख कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखल्या जाते. तसेच गावा प्रमाणे देशमुख यांच्या कुटुंबात आजोबा ,पणजोबा ते वडीलापर्यंत घोडा पाळण्याची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे घोडा पाळणे हे प्रतिष्ठेचे समजल्या जाते आणि या आपल्या परंपरे च्या मोहापायी सतीश देशमुखांनी घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे.


मागणी मागे..


परंतु या घोडा बांधणी नाट्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत, सदर अर्ज सोशल मीडियावर व प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे शासनाची नाहक बदनामी होत असल्याचं सांगून संदर्भीय प्रकरणाचा सविस्तर अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिलेयत.