मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, याचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. दरम्यान या हिरेन मनसुख यांनी 2 मार्चला पत्र लिहिले होते. मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. या पत्रात त्यांनी पीडित असूनही आरोपीसारखी वागणूक मिळत असल्याची खंत हिरेन यांनी पत्रातून मांडली आहे.
काय आहे त्या पत्रात?
कार चोरीप्रकरणी तेच तेच प्रश्न विचारुन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी मानसिक झळ केल्याचा दावा हिरेन मनसुख यांनी केला आहे. पीडित असूनही चौकशीत आरोपीसारखी वागणूक मिळत आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींकडूनही फोन करून विनाकारण मानसिक छळ केला जात आहे. कार चोरणाऱ्या गुन्हेगाराबाबत माहिती नाही, तरीही माझा छळ केला जात आहे. कार चोरीला गेल्याबद्दल जबाब दिला, तरी छळ सहन करावा लागतोय, असे ते आपल्या पत्रात म्हणाले.
कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल होते. मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
Mansukh Hiren Death | मनसुख हिरेनच्या मृतदेहाभोवती रुमाल आढळल्याने घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?