बीड : मराठा मोर्चाच्या आंदोलनाने अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. गेवराई शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

आंदोलकांनी लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी लक्ष्मण पवार घराबाहेर आले. आंदोलकांसोबत चर्चा सुरु होती, मात्र चर्चेनंतर काही जणांनी अचानक लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक केली.

पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने जमावाला पांगवलं आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान,  राज्यभरात सुरु असलेलं हे आंदोलन शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

अनेक राजकीय नेत्यांनीही परळीतील आंदोलनाला भेट दिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. तर काँग्रेसचे भाई जगताप आणि आमदार अब्दुल सत्तार हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परळीत दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली.

संबंधित बातम्या :

मुंबई बंद LIVE: मराठा मोर्चाकडून मुंबई बंद स्थगित

भाजपात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु, संजय राऊतांचा दावा

साताऱ्यात मराठा मोर्चा, आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलू दिलं नाही!

काकासाहेब शिंदेंच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंची भावूक फेसबुक पोस्ट