Amravati News : अमरावतीच्या दर्यापूरमध्ये विनापरवाना बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. दर्यापूर नगरपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. 


आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यानंतर दर्यापूरमधील पुतळा हटवण्याची तयारी सुरु झाली होती. त्यामुळे हा पुतळा काढू नये यासाठी दर्यापूरमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. तसंच पुतळा हटवू नये या मागणीसाठी काल दुपारी दर्यापूरात शेकडो कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र मध्यरात्री तीनच्या सुमारास नगरपालिका आणि पोलिसांनी हा पुतळा हटवला आहे. त्यामुळे दर्यापूरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तिकडे राजापेठ उड्डाणपूलावरील शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या मुद्द्यावरुन युवा स्वाभिमान पालिका आयुक्तांविरोधात पोलिसांत तक्रार करणार आहे. तसंच युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्यावरुन अमरावतीचं वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


अमरावतीमध्ये विनापरवाना बसवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवल्यानंतर वातावरण तापलंय. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहेत. तसंच पालिका आयुक्तांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे.


नेमकं प्रकरण काय? 


अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या उड्डाणपुलाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. परंतु या पुतळ्यावरून शहरात मोठे राजकारण तापले होते. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता हा पुतळा बसवला होता. मात्र काल (रविवारी) पहाटे हा पुतळा शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने तिथून काढला आहे. ही कारवाई करताना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी पोलिसांचा फौजफाटा ठेवला होता. 


राणा दाम्पत्य पोलिसांच्या नजर कैदेत आहे. आताही आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. दरम्यान पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर राणा यांच्या घराकडील दोन्ही रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत. तर ज्या ठिकाणावरून पुतळा हटवला त्याच ठिकाणी हा पुतळा बसवा अशी मागणी राणा समर्थकांनी केली आहे. तर रवी राणा आणि नवनीत राणा यांची अद्यापही प्रतिक्रिया समोर आली नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अमरावती, दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं! नेमकं घडलंय तरी काय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha