कोल्हापूर एसटी विभागात राज्यातील पहिला बचाव दल सज्ज
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2019 06:08 PM (IST)
कोल्हापुरातील बचाव दल हे राज्यातील पहिला बचाव दल असणार आहे. या बचाव दलाने आज कोल्हापुरच्या भुईबावडा या घाटातील 300 फूट खोल दरीत थरारक प्रात्यक्षिके केली.
कोल्हापूर : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने स्वतःचे बचाव दल तयार केले आहे. कोल्हापूर एसटी विभागाच्या पुढाकारातून हे दल तयार करण्यात आलं आहे. एसटी अपघाताच्या वेळी प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने कोल्हापूर एसटी विभागाच्यावतीने हे बचाव दल कार्यरत असणार आहे. कोल्हापुरातील हे बचाव दल राज्यातील पहिला बचाव दल आहे. या बचाव दलाने आज कोल्हापुरच्या भुईबावडा या घाटातील 300 फूट खोल दरीत थरारक प्रात्यक्षिके केली. ग्रामीण भागातील दळणवळणाचं एक महत्त्वाचं माध्यम एसटी आहे. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन प्रवाशांना सेवा देते. ही सेवा बजावत असताना अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी आणि घाटात एसटीचे अपघात होत असतात. या अपघातात प्रवाशांना तात्काळ मदत व्हावी, जखमींना रुग्णालयापर्यंत लवकर पोहोचवलं जावं, त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी कोल्हापूर एसटी विभागाच्या वतीनं स्वतःचे बचाव दल तयार केले आहे. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक पलंगे यांच्या मार्गदर्शनातून आणि गिर्यारोहक असणारे एसटी चालक अमोल अवळेकर यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागातील 11 आगारातून 15 कर्मचाऱ्यांची या दलात निवड करण्यात आली आहे. त्यांना आपत्कालीन परिस्थिती कशी हताळावी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. एसटी चालक आणि स्वतःच गिर्यारोहक असल्यामुळे अमोल अवळेकर यांनी एसटीचं स्वतःचं बचाव दल आपण तयार करू शकतो, असा कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. यासाठी अवळेकर यांनी कोल्हापूर विभागातील 11 आगारांमधून पंधरा सक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षणही दिले. ते आता स्वतः खोल दरीत उतरुन प्रवाशांचे मदतीसाठी सज्ज झाले आहेत