नागपूर : राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या विरोधात नागपूर खंडपीठानं न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी जामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. तसंच त्यांना 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहे.


नागपूरच्या निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने त्यांच्या गृह निर्माण प्रकल्पातून महापालिकेला रस्ता बांधणीसाठी जागा दिली होती. पण मोबदल्यात संस्थेला वाढीव टीडीआर मिळाला नाही. संस्थेने नगर विकास विभागात रणजीत पाटील यांच्याकडे अपील केलं होतं. ऑगस्ट 2015 पासून रणजीत पाटील यांनी निर्णय राखीव ठेवला होता.

संस्थेच्या न्यायालयातील अपीलानंतर खंडपीठाने नगर विकास विभागाला लवकर निर्णय जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. पण वारंवार सांगून ही नगर विकास विभागाने निर्णय जाहीर न केल्यामुळे खंडपीठाने न्यायालयाच्या अवमान प्रकरणी 28 नोव्हेंबर रोजी व्यक्तिशः उपस्थित राहण्याबद्दल जामीनपात्र वॉरंट रणजीत पाटील यांना बजावलं आहे.