नाशिक : नाशिकमध्ये तब्बल 9 वर्ष बंदिस्त करुन ठेवलेल्या भावा-बहिणीची सुटका झाली आहे. मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या वडिलांनीच त्यांना वाड्यातील एका खोलीत बंदिस्त करुन ठेवल्याची बाब समोर आली आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात पुराणिक वाड्यात राहणाऱ्या श्रीराम पुराणिक आणि त्यांच्या बहिणीला बंदिस्त करण्यात आलं होतं. बंदिस्त केलेल्या भावंडांना त्यांचे वडिलच गोदाघाटावर भीक्षा मागून पोट भरत होते. गेल्या आठवड्यात वडिलांची तब्येत खालावल्याने त्यांचं घराबाहेर पडणं बंद झालं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

बंदिवासात असलेल्या श्रीरामनं इंजिनिअरिंगची पदवीही घेतली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना वर्दी देत तिघांनाही जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात दाखल केलं आहे. बंदिवासातून सुटल्यावर पुराणिक भावंडं उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.