मुंबई: कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे. विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे.आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहे. कामगारांच्या अतिरिक्त वेळेत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे. शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्याबाबत बदल करण्यात आला आहे.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल (बुधवारी) घेतला. दुकाने आणि आस्थापनांमधील कामांच्या तासांची मर्यादा ही ९ तासांवरून १० तास करण्यात आली आहे.  तासांची मर्यादा वाढवली असली तरीदेखील कारखान्यांमधील तर कामगारांना एका आठवड्यात (एक दिवसाची रजा वगळता) जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ सरासरी दररोज आठच तास काम कामगारांकडून करून घेता येईल. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ तास इतकी होती. आता ती १२ तास करताना ८ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. तसेच, ४८ तासांऐवजी आठवड्यात ५६ तास काम करवून घेतलेले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल. त्यापेक्षाही अधिक काम करवून घेतले तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील. कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.


कारखाने, दुकाने अधिनियमात सुधारणा


राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगार संधी वाढीसाठी कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने तसेच आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा २ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० होतील. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. 


मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली माहिती


मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटला की बऱ्याचदा कारखान्यांना जास्त ऑर्डर आल्या किंवा त्यांना त्यांचा उत्पादन जास्त काढायचा असल्यास त्यांना बाहेरून नवीन कामगार बोलवावे लागतात त्या शिफ्टचे शेड्युल असते त्यामुळे त्यामध्ये काही अडथळे येतात त्यामुळे बाकी राज्यांप्रमाणे आणि बाकी देशांप्रमाणे जी लवचिकता कामगारांच्या कामांमध्ये आणि वेळेमध्ये असायला पाहिजे ती लवचिकता आता आपण आपल्या इथे आणतोय यामध्ये कारखाने अधिनियम नुसार 51 कलमानुसार नऊ तासांच्या वर त्यांना काम करता येत नाही त्यामध्ये आपण लवचिकता आणली आहे कोणत्याही कारखान्याला जरासं वाटलं त्याचे उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना कामगारांच्या कामाची वेळ वाढवता येणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत. कामगारांची परवानगी लागणार आहे सरकारची परवानगी लागणार आहे, सोबतच कामाचे तास आठवड्यातील 48 तासाच्या वर नेता येणार नाहीत आणि जेवढे वाढीव काम आहे त्या वाढीव कामाचे सुद्धा त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. याच्यात कामगाराबद्दल पूर्ण सुरक्षा अधिकार लक्षात घेऊन ही लवचिकता आपण आणतो आहे, अशी माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे