मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणावर काढलेल्या जीआरवर त्यांचेच मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्यभर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन द्यावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी करावी असं आवाहन छगन भुजबळांनी केलं. सरकारच्या या जीआरवर आम्हाला संभ्रम आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असंही छगन भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढला. त्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गोष्टीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांनीही नाराजी व्यक्त केली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं.

चार दिवसात न्यायालयात जाऊ

छगन भुजबळ म्हणाले की, या जीआर बाबत अद्याप संभ्रम आहे. याबाबात आमच्या नेत्यांनी आणि अभ्यासकांनी, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिली आहेत. काही ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहेत. अनेक कायदेतज्ज्ञ, वकील आणि इतरांशी चर्चा करून याची माहिती घेत आहोत. जर आवश्यक असेल तर चर्चा करून येत्या चार दिवसात त्या विरोधात न्यायालयात जाऊ.

या जीआरच्या विरोधात न्यायालयात जाण्याची आमची तयारी असून त्यासाठी ज्या कागदपत्रांची जुळवाजुळवी करावी लागेल ती आम्ही करू असं छगन भुजबळ म्हणाले. राज्यातील कार्यकर्त्यांनी त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देऊ नये अशी निवेदनं द्यावीत. आपले म्हणणे शांतपणे मांडावं. या व्यतिरिक्त जर कुणी उपोषण करत असेल किंवा इतर काही मार्ग पत्करत असेल तर त्या गोष्टी तूर्तास थांबवाव्यात असं भुजबळ म्हणाले.

भुजबळांची बैठकीला दांडी

मुंबईतल्या मराठा आंदोलनामुळे उडालेली धूळ खाली बसत नाही, तोच आता राज्यभरातील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय. यातील सर्वांत मोठे हिरो ठरले ते छगन भुजबळ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले खरे, मात्र बैठकीत काही सहभागी झाले नाहीत.

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळपूर्व बैठकीला हजेरी लावून ते निघून गेले. त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्याचं नेमकं कारण विचारण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला खरा, मात्र भुजबळ काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे मग ते नाराज असल्याची आणखीनच चर्चा रंगली. तिथून ते थेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी प्रकाश शेंडगेंसह अनेक ओबीसी नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

ही बातमी वाचा: