मुंबई : शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, अशी वल्गना करणारं राज्य सरकार सपशेल तोंडघशी पडलेलं दिसतं आहे. कारण नाफेडकडून होणाऱ्या तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. त्यामुळं 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुक्काम ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभ ठाकलं आहे.

वाशिममध्ये तूर खरेदी अद्याप नाही

वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी नाफेड्ची तूर खरेदी अद्यापही सुरु नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी या आर्थिक विंवचनेत सापडला आहे.

यवतमाळमध्ये तूर खरेदीत शेतकऱ्यांची पायपीट

तर यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तूर खरेदी सुरू आहे. मात्र यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी तूर खरेदी होईल, या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी पायपीट मात्र थांबली नसल्याचेही दिसून येत आहे.

अकोल्यात लाखो क्विंटल तूर खरेदीविना

अकोला जिल्ह्यात गेल्या 28 फेब्रुवारीपासून कित्येक क्विंटल तूर अकोला बाजार समितीच्या यार्डात खरेदीविना तशीच पडून आहे. काल संध्याकाळपर्यंत अकोला जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर 2084 गाड्या तूर खेदीची प्रतिक्षा करत उभ्या आहेत.

दरम्यान, तूर खरेदी न झाल्यास खरीप हंगामात काय पेरायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. त्याचप्रमाणे संधीचा फायदा घेत व्यापारी तुरीचे भाव पाडण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

जर शेतकऱ्यांकडील तुरीची शंभर टक्के खरेदी करायची असेल तर आणखी 12 दिवस खरेदी सुरू ठेवावी लागेल. त्यामुळं सरकार तूर खरेदीची मुदत आणखी वाढवणार की त्यांना वाऱ्यावर सोडणार हे पाहावं लागेल.