चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध दारुने भरलेल्या गाडीनं पोलीस उपनिरिक्षकाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांचं यामध्ये निधन झालं आहे. चिडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस सेवेतील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना गेल्याच महिन्यात पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी आहे. मात्र ही दारूबंदी डावलून लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी केली जाते. मात्र दारु तस्करांची हिंमत वाढल्याने आता पोलीस अधिकाऱ्यांना चिरडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
छत्रपती चिडे पहाटे 4 वाजताच्या सुमारास मौशी-चोरगाव येथे पेट्रोलिंग करत होते. एका वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती चिडे यांना मिळाली होती. त्यानुसार आपल्या चार सहकाऱ्यांसह चिडे यांनी एक संशयित स्कॉर्पिओ गाडी अडवली.
मात्र पोलिसांना पाहताच स्कॉर्पिओ गाडीने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. यावेळी स्कॉर्पिओ गाडीने एका ट्रॅक्टरला धडक दिली. दारू तस्करांना पकडण्यासाठी चिडे यांनी स्कॉर्पिओकडे धाव घेतली, मात्र दारू तस्करांनी गाडी रिव्हर्स घेत चिडे यांना गाडीखाली चिरडले. जखमी झालेल्या चिडे यांना तात्काळ ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्कॉर्पिओ वाहन घेऊन आरोपी पसार झाले. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साहिल शहजाद नावाचा तस्कर या घटनेत प्रमुख आरोपी आहे.