मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबचे सूतोवाच केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पितृपक्षानंतर कुठल्याही क्षणी हा विस्तार होऊ शकतो. यामध्ये 6 मंत्र्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे, तर प्रकाश मेहतांचं खातं बदललं जाऊ शकतं. तसंच एका मराठा मंत्र्याची तामिळनाडूच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर सहकारनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दालनाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. मराठवड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.

केंद्रापाठोपाठ राज्यातही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री

दरम्यान प्रत्येक मंत्र्याचे काम पाहून बदल करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्र्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे. या विस्तारात काही खाते बदल, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, विस्तार नेमका कधी होणार याबाबत त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. या मंत्रिमंडळ विस्तारात डागाळलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री घरी बसवणार का हा प्रश्न विचारला जात आहे.

एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगपतींना जमीन दिल्याचे सुभाष देसाईंवर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळतो की त्यांना मुख्यमंत्री अभय देतात हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.